काँग्रेसचे आंदोलन बेगडी, काँग्रेसला मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही
भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांचे टीकास्त्र

मुंबई, १६ एप्रिल २०२५ :
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मालमत्ता हडप करण्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला “बेगडी” ठरवत काँग्रेसला “मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही” असा कठोर शब्दांत समाचार घेतला.
भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
दानवे म्हणाले, “काँग्रेसला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र कोणत्याही खासगी संस्था किंवा व्यक्तीची जमीन, निधी किंवा मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप करण्याचा अधिकार नाही.”
“नॅशनल हेराल्ड – स्वातंत्र्यसैनिकांची अमूल्य देणगी”
दानवे यांनी स्पष्ट केले की, १९३७ साली ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानातून ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची स्थापना झाली होती. या वृत्तपत्रावर किंवा संबंधित मालमत्तेवर नेहरू-गांधी कुटुंबाची मालकी होती, अशी कुठेही नोंद नाही, असा दावा त्यांनी केला.
त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने ‘यंग इंडिया’ नावाची कंपनी स्थापन करून हेराल्डच्या मोठ्या मूल्याच्या मालमत्तेचा दुरुपयोग केला. या घडामोडी कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
2008 नंतरचे वादग्रस्त आर्थिक व्यवहार
दानवे यांनी सांगितले की, 2008 साली हेराल्डचं प्रकाशन थांबल्यावर काँग्रेसने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या कंपनीला 90 कोटींचा निधी दिला, जो पक्षाच्या निधीचा बेकायदेशीर वापर होता.
या प्रकरणी 2012 साली भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात याचिका दाखल करून काँग्रेसच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप केला होता. या याचिकेत ‘यंग इंडिया’ने कवडीमोल दरात मोठी रक्कम वसूल केल्याचा उल्लेख आहे.
सरकारी तपास आणि पुढील कारवाई
दानवे म्हणाले की, कोर्टाच्या आदेशानंतर सरकारी तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शेवटी, रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर निशाणा साधत सांगितले की, “स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागावर उभारलेली संस्था ही कोणाच्याही खासगी फायद्यासाठी वापरली जाणे ही लोकशाही आणि देशाच्या मूल्यांची घोर पायमल्ली आहे.”
✍️ – मुकुंद कुलकर्णी
कार्यालय सचिव
#swatantryanews#marathinews#maharashtra#