महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

मुंबई, दि. ९ एप्रिल २०२५: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवार, दि. १४ एप्रिल २०२५ रोजी देशभर साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दोन विशेष दृकश्राव्य माध्यमांतून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला मानवंदना देण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या १७ मिनिटांच्या माहितीपटाचे प्रसारण एक्स (Twitter), फेसबुक आणि यूट्यूब या समाजमाध्यमांवर करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण एक्सवर, तर सह्याद्री वाहिनीवर दुपारी १.३० वाजता करण्यात येणार आहे.
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ – एक दुर्मिळ माहितीपट
१९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि फिल्म्स डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा माहितीपट म्हणजे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण क्षणांचे दस्तावेजी दर्शन घडवणारा चित्रपट आहे.
या माहितीपटात त्यांच्या बौद्ध धर्म स्वीकाराचा ऐतिहासिक क्षण, नेपाळ दौरा आणि त्यांच्या अंत्ययात्रेतील दृष्यांचा समावेश आहे. नामवंत दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून, छायांकन मधुकर खामकर, संकलन जी.जी. पाटील यांनी केले आहे. संगीत दत्ता डावजेकर यांचे असून, निवेदन डेव्हिड अब्राहम यांनी केले आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ – जीवनपटाचा भव्य आविष्कार
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अज्ञात पैलूंना उजाळा देतो. या चित्रपटात डॉ. आंबेडकर यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मामुट्टी यांनी साकारली असून, रमाबाईंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी झळकतात. तसेच मोहन गोखले आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या पटकथेचे लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार, संशोधन डॉ. य. दि. फडके, सल्लागार श्याम बेनेगल, वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, आणि छायांकन अशोक मेहता यांनी केले आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने याचे संयुक्त निर्मिती केली आहे.
#swatantryanews#marathinews#maharashtra#