swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > शासकीय योजना > समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री यांनी घेतला समाज कल्याण विभागाचा आढावा

पुणे, दि. २९: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

समाज कल्याण आयुक्तालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत मंत्री शिरसाट बोलत होते. यावेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. मंत्री शिरसाट यांनी अंमलबजावणी यंत्रणेला मार्गदर्शन करताना सांगितले की, योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचे विश्लेषण करून त्यावर उपाययोजना केल्या जातील. अनुसूचित जाती उपयोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय यंत्रणांनी अन्य विभागांशी योग्य समन्वय साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक त्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नवीन वसतिगृह योजनांचा आढावा
राज्यात २५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृहे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी घोषणा मंत्री शिरसाट यांनी केली. बैठकीनंतर त्यांनी सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येरवडा येथील युनिट क्रमांक ३ आणि ४ च्या शासकीय वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

#swatantryanews#marathinews#maharashtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *