भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे, अर्थात महापेक्स २०२५, उद्घाटन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे पार पडले.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी भारतीय टपाल विभागाने दीडशे वर्षांहून अधिक काळामध्ये लोकांशी भावनिक नाते जोडत दिलेल्या सेवांची प्रशंसा केली. “डाक विभागाच्या सेवांमुळे विश्वासाची परंपरा जोपासली गेली असून, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये हा विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी, नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी सचित्र विरूपण प्रकाशित करण्यात आले. तसेच, मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड ‘माय स्टॅम्प’ चे अनावरणही राज्यपालांच्या हस्ते झाले.
महापेक्स २०२५ च्या बोधचिन्हाचे उद्घाटन आणि विशेष आवरण प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. यामध्ये जागतिक व्यापार केंद्र, ब्रेल लिपी, आणि डाक सेवा इ सायकल अभियानावर आधारित विशेष आवरणांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र व गोव्याचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, जागतिक व्यापार केंद्र मुंबईचे संचालक विजय कलंत्री, टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉय, आणि मानेक शाह यांच्यासह, काही देशांचे वाणिज्यदूत व पोस्ट तिकीट संग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापेक्स प्रदर्शन चार दिवस चालणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
#swatantryanews#marathinews#maharashtra#