swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > राजकारण > युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस|

युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस|

ठाणे :
देश आणि समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन न दिसणाऱ्या शत्रूशी लढा देणे गरजेचे आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून समाज पोखरण्याचे कृत्य थांबवण्यासाठी जागरूक राहा आणि देशभक्त सैनिक म्हणून पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन सिडको ऑडिटोरियम, वाशी येथे झाले. या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, अभिनेता जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

“नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे महत्त्व

कार्यक्रमाची सुरुवात “Art of Silence” या मूकनाट्याने झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभियानाच्या चित्रफितीचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी ड्रग्समुळे होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक नुकसानीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, प्रवाहाविरुद्ध लढण्यासाठी मानसिक ताकद गरजेची आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत ड्रग्सविरुद्ध मोठी लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रग्सविरुद्धची राष्ट्रीय लढाई

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ड्रग्सविरुद्ध एकत्रित लढ्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “कॅनडाचे उदाहरण लक्षात घेता, ड्रग्समुळे त्या देशाची सामाजिक व्यवस्था कोलमडली आहे. मात्र भारत ही लढाई जिंकू शकतो,” असे फडणवीस म्हणाले. सर्व राज्यांनी एकत्र येऊन ड्रग्समुक्त भारत घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

टोल फ्री क्रमांकाचा वापर करा

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने ८८२८ ११२ ११२ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकाचा प्रभावी वापर करून अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाईत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

जॉन अब्राहम आणि इतर मान्यवरांचे मनोगत

अभिनेता जॉन अब्राहम यांनी शिस्तमय जीवनाची महत्त्वता सांगितली. “आपल्या आचरणाने मित्र परिवारात आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन त्यांनी केले. वनमंत्री गणेश नाईक यांनी चांगल्या कामाचा ध्यास हाच खरा सकारात्मक “नशा” असल्याचे सांगून नवी मुंबई महानगरपालिकेला नशामुक्त अभियानातही अव्वल ठरविण्याचा विश्वास व्यक्त केला.

नवी मुंबई पोलिसांचे कौतुक

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या “नशामुक्त नवी मुंबई” उपक्रमासाठी अभिनंदन केले आणि उपस्थितांना ड्रग्सविरुद्ध सैनिक बनण्याचे आवाहन केले.

नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रत्येक नागरिकाला यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

#swatantryanews#marathinews#maharashtra#.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *