मुंबई मंत्रालय : रस्ते अपघात कमी करण्यासाठी ए.आय. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी गुगलसोबत झालेल्या कराराचा उपयोग करण्याचे निर्देश दिले. तसेच घाट भागातील अपघात टाळण्यासाठी इंजिनियरिंग सोल्यूशन शोधण्यावर भर देण्यात येणार आहे.
ईव्ही पॉलिसी आणि जुन्या वाहनांचे व्यवस्थापन
राज्यातील वाहतूक व्यवस्था शाश्वत करण्यासाठी येत्या ३ वर्षांत नवीन ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) धोरण आणले जाणार आहे. याशिवाय १५ वर्षे पूर्ण झालेली वाहने आणि १३ हजार शासकीय वाहने भंगारात टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
परिवहन सेवेत सुधारणा: होणार बाईक टॅक्सी आणि मॅक्सी कॅब
परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी आणि मॅक्सी कॅब सेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य परिवहनच्या १५ वर्षे जुनी झालेल्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. आणि सी.एन.जी. तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवली जाईल.
वडसा-गडचिरोली आणि सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय बंदर आणि विमानतळ प्राधिकरणाशी संबंधित योजनांवरही आढावा घेण्यात आला.
बस सुरक्षेसाठी एस.ओ.पी.
राज्य परिवहन बसेससाठी सुरक्षाविषयक मानक कार्यपद्धती (एस.ओ.पी.) निश्चित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस मंत्री धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक, सुजाता सौनिक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य परिवहन व्यवस्था सुरक्षित, पर्यावरणस्नेही आणि कार्यक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्वातंत्र्य न्युज मुंबई – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी