मुंबई मंत्रालय : चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देत महाराष्ट्रात चित्रीकरण सुलभ करण्यासाठी ‘एक खिडकी’ ऑनलाईन परवानगी प्रणाली लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चित्रपट निर्मात्यांना जलद आणि पारदर्शक सेवा देत रोजगार निर्मितीला चालना देण्याचे उद्दिष्ट या निर्णयामागे आहे.
मुख्यमंत्र्यांनी गोरेगाव येथील चित्रनगरीत मराठी चित्रपटांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञांना अधिक संधी उपलब्ध होतील.
मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष आयोजन करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या जीवनावर आधारित एक व्यावसायिक चित्रपट तयार करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाईल. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांच्या कार्याची माहिती पोहोचवण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्यात येईल.
‘हर घर संविधान‘ मोहिमेला गती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी ‘हर घर संविधान’ उपक्रमाद्वारे संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही दिले. या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये संविधानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल.
सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेतला गेला. या बैठकीत सांस्कृतिक प्रबोधनासोबत रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस मंत्री धनंजय मुंडे, ॲड. आशिष शेलार, जयकुमार गोरे, सुजाता सौनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला सॉफ्ट पॉवर म्हणून ओळख दिली असून, महाराष्ट्राला सांस्कृतिक चळवळींचे केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वातंत्र्य न्युज मुंबई- न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.