होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.
संबंधित व्यावसायिकांनी महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषध विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र, प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि सीसीएमपी सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याची खात्री करणे ही विक्रेत्यांची जबाबदारी असेल,अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
हा निर्णय आधुनिक वैद्यकशास्त्र आणि होमिओपॅथी यांचा समन्वय साधण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. होमिओपॅथी व्यावसायिकांना या माध्यमातून त्यांच्या वैद्यकीय सेवांचा विस्तार करता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे होमिओपॅथी व्यावसायिकांना अधिक वैद्यकीय सुविधा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवी दिशा निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.