शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीसंदर्भात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) हे अद्ययावत मोबाईल ॲप उपलब्ध करण्यात आले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक पाहणी 1 डिसेंबर 2024 पासून सुरू केली असून, 15 जानेवारी 2025 पर्यंत ती पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार अभिजीत बारावकर यांनी केले आहे.
महसूल विभागामार्फत यापूर्वी ई-पीक पाहणी हे ॲप वापरात होते. मात्र, शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी या ॲपमध्ये तांत्रिक सुधारणा करून डिजिटल क्रॉप सर्वे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक नोंदीसह बांधावरील झाडे, चालू पड/कायम पड क्षेत्रांची नोंद अक्षांश व रेखांशासह करता येते.
पीक पाहणी कालावधी: हा
शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी: 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 असा असेल
सहायक स्तरावरील नोंदणीसाठी: 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
प्रत्येक गावात महसूल विभागाचे सहायक हंगामाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
ई-पीक पाहणी का महत्त्वाची?
ई-पीक पाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला पेरा वेळेत नोंदवावा, असेही तहसीलदार बारावकर यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल सुविधा:
डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे शेतकऱ्यांना आता स्वतःच्या शेताची पीक पाहणी सहज करता येणार आहे. या सुविधेमुळे पीक नोंदी प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि वेळेवर शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.
#swatantryanews#marathinews#maharashtra#