विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहात संबोधन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळाचे सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधीमंडळ सचिवालायाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले की,
महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य आहे आणि त्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण देशावर आहे. राज्याने थेट परकीय गुंतवणुकीत देशात प्रथम स्थान राखले असून, 2024-25 मध्ये 1,13,236 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे. यामुळे राज्याचे आर्थिक सामर्थ्य आणि भविष्य उज्जवल दिसते.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनमानाला सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाची योजनांची सुरूवात केली आहे. “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना”, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0”, आणि “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024” यासारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा मिळणार आहेत.
राज्य सरकारने उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे जाहीर केली आहेत. सेमीकंडक्टर, विद्युत वाहने, आणि अंतरिक्ष प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे राज्यात 3.29 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1.18 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली असून, महिलांना आर्थिक मदतीसह सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात अधिक संधी दिल्या जात आहेत. महिलांसाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” आणि “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला नवोद्योग योजना” यासारख्या योजनांचा कार्यान्वयन करण्यात आले आहे.
युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार संधी
“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” आणि “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे” यांसारख्या योजनांमुळे युवकांना कौशल्यांची वाव मिळणार आहे. यामुळे राज्यातील युवक रोजगारक्षम होऊन एक सक्षम श्रमिक तयार होईल.
राज्य सरकारने आरोग्य सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, महिला विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या, तसेच नवीन मेट्रो प्रकल्प यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
“महाराष्ट्र पर्यटन धोरण, 2024” अंतर्गत शाश्वत पर्यटन स्थळांचा विकास आणि एकात्मिक पर्यटन प्रकल्पांची सुरूवात होणार आहे. पर्यावरणीय बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन “मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती दलाची” स्थापना केली आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणात हे सर्व मुद्दे महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग ठरविणारे आहेत.
– स्वातंत्र्य न्यूज : न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी