नाशिक : 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय साधत सुक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरातील या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनातील प्रत्येक बाब विचारपूर्वक आखावी, असेही त्यांनी नमूद केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित साप्ताहिक सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी 522 कोटी रुपयांचा सुधारीत आराखडा सादर केला. सिंहस्थ कालावधीत भाविकांसाठी रस्ते, विश्रामगृह, आणि आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आणि कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी 40 कोटी रुपयांच्या कामांचा आढावा घेतला. नाशिक शहर, श्री क्षेत्र कावनई, सर्वतीर्थ टाकेद येथील रस्त्यांचे बांधकाम व इतर विकासकामांची माहिती यावेळी सादर करण्यात आली.
सुरक्षा व्यवस्थेसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने सिंहस्थ विषयक नियोजनाचा आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सादर केला. तसेच, महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता डी.एच. पडळकर यांनी कुंभमेळ्यातील वीजपुरवठा आणि सुविधा यांसंबंधी माहिती दिली.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, “सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून, त्याच्या नियोजनात कुठलाही त्रुटी राहता कामा नये. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे.”
बैठकीला नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य न्यूज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.