
राज्यात कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर – ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू
सातारा, दि. 4 : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने व प्रभावीपणे मिळावा यासाठी केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचे डिजिटल डेटाबेस तयार करून त्यांच्या शेतांची आणि पिकांची संपूर्ण माहिती संकलित केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पाटण येथे शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ प्रमाणपत्रांचे वाटप
पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी सन्मानपत्रांचे वाटप पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.

ॲग्रिस्टॅक योजनेचे फायदे
🔹 शेतकऱ्यांचे आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), हंगामी पिकांची नोंदणी (क्रॉप सोन रजिस्ट्री) आणि शेतांचे जिओ रेफरन्स डेटा एकत्रित करून सातत्याने अद्ययावत करण्यात येणार आहे.
🔹 राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक आणि वेळेवर मिळेल.
🔹 स्वस्त दरात शेती कर्ज, उच्च दर्जाच्या शेती निविष्ठा आणि मार्केटिंग सुविधा मिळणार.
🔹 पीएम किसान योजनेतील अनुदान प्राप्त करण्याची प्रक्रिया सोपी होईल.
🔹 किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंडासह शेती विकासासाठी कर्ज मिळवणे सुलभ होईल.
🔹 पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील नुकसानभरपाई प्रक्रियेत सुलभता येईल.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि त्यांना आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
📝 – स्वातंत्र्य न्यूज | न्यायासाठी लढणारी बातमी