भारताच्या मेड-इन-इंडिया एसएसआई मंत्र सर्जिकल रोबोटिक सिस्टीमने आरोग्यसेवेत नवा इतिहास रचला आहे. या अत्याधुनिक रोबोटिक सिस्टीमद्वारे 286 किलोमीटर अंतरावरून दोन यशस्वी ‘रोबोटिक कार्डियक सर्जरी’ करण्यात आल्या आहेत. ही सर्जरी गुरुग्राम येथून मणिपाल हॉस्पिटल, जयपूर येथे रिमोट कंट्रोलद्वारे पार पडली. या क्रांतिकारी तंत्रज्ञानाने भविष्यातील आरोग्यसेवेची नवी दारे उघडली आहेत.

जगातील सर्वांत कठीण सर्जिकल प्रक्रिया अवघ्या मिनिटांत पूर्ण
टीईसीएबी (Totally Endoscopic Coronary Artery Bypass) ही जगातील सर्वांत कठीण कार्डियक सर्जिकल प्रक्रिया मानली जाते. मात्र, एसएसआई मंत्रच्या मदतीने ही प्रक्रिया अवघ्या 40 मिली सेकंदांच्या विलंबासह यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. याशिवाय, टेलीरोबोटिक-असिस्टेड इंटरनल मॅमरी आर्टरी हार्वेस्टिंग प्रक्रिया अवघ्या 58 मिनिटांत यशस्वीरीत्या पार पडली. ही सर्जरी अचूकता, वेग आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत क्षमतेचा उत्तम नमुना ठरली.
आरोग्यसेवेतील क्रांतीचे नेतृत्व
एसएस इनोवेशनचे संस्थापक डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. ते म्हणाले, “टेलीसर्जरीने आरोग्यसेवेत क्रांती घडवून आणली आहे. भौगोलिक अडथळे पार करून, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत तज्ज्ञ वैद्यकीय सेवा पोहोचवणे आता शक्य झाले आहे. भारतासारख्या देशासाठी, जिथे आरोग्यसेवेत मोठ्या प्रमाणावर असमानता आहे, हे तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणणारे आहे.”
रोगी सेवेत नवा अध्याय
जयपूरच्या मणिपाल हॉस्पिटलमधील कार्डियक सर्जरीचे प्रमुख डॉ. ललित मलिक म्हणाले, “या क्रांतिकारी तंत्रज्ञानाने आरोग्यसेवेच्या प्रगतीसाठी नवा अध्याय सुरू केला आहे. जयपूरमधील एका वृद्ध रुग्णावर रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या अचूकतेचे आणि वेगवान उपचाराचे उदाहरण आहे.”
टेलीसर्जरीच्या भविष्यातील वाटा
एसएस इनोवेशनने विकसित केलेली एसएसआई मंत्र 3 सर्जिकल रोबोटिक सिस्टीम ही जगातील एकमेव सिस्टीम आहे जिला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेची (सीडीएससीओ) मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे आता टेलीसर्जरी आणि टेली-प्रॉक्टोरिंगद्वारे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळणार आहे. डॉक्टर आता रुग्णापासून दूर बसूनही अत्याधुनिक उपचार देऊ शकणार आहेत.
भारतीय आरोग्यसेवेसाठी मैलाचा दगड
एसएसआई मंत्र सिस्टीमने केवळ भारतीय आरोग्यसेवेतील प्रगती दर्शवली नाही, तर जागतिक आरोग्यसेवेतील नवे मार्गही प्रशस्त केले आहेत. या यशामुळे भारताने जगासमोर उच्चस्तरीय वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आदर्श ठेवला आहे. भविष्यात, हे तंत्रज्ञान आरोग्यसेवा अधिक सुलभ, अचूक आणि उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
#swatantryanews#marathinews#maharashtra#