मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर होणारी प्रत्येक घरे सौर ऊर्जेवर आधारित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील किमान १३ लाख घरकुलांसाठी मंजुरी प्रक्रिया सुरू असून, लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून रु. ४५० कोटींचा निधी लवकरच वितरित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महाआवास अभियानाच्या माध्यमातून गतीमान अंमलबजावणी
ग्रामीण गृहनिर्माण योजना प्रभावी आणि दर्जेदार रीत्या राबविण्यासाठी “महाआवास अभियान” हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेला लोकसहभागाचा घटक समाविष्ट करून अंमलबजावणी गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण रस्त्यांसाठी सिमेंट रस्त्यांची निर्मिती अनिवार्य
ग्रामीण भागातील रस्त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सिमेंटचेच रस्ते तयार करावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि पाणंद रस्त्यांसाठी नव्या निकषांची आखणी करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. कोकणातील साकव आणि पाणंद रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
ग्रामविकास योजनांचा १०० दिवसांचा आराखडा
राज्यातील विविध ग्रामविकास योजना जसे की राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते व पूल दुरुस्ती, तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांच्या कालावधीत या योजना गतीमान करण्याच्या सूचना केल्या.
बैठकीतील उपस्थित मान्यवर
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस मंत्री धनंजय मुंडे, अशिष शेलार, जयकुमार गोरे, सुजाता सौनिक, विकास खारगे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रात शाश्वत ऊर्जा, दर्जेदार रस्ते आणि पारदर्शक अंमलबजावणीवर भर देत ग्रामीण भागाचे परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वातंत्र्य न्युज मुंबई – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी