राजुर बहुला येथे संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको; गावातील कंपन्यांवर अनधिकृत प्रदूषणाचा आरोप.
*”नाशिक– राजुर बहुला येथे १२ जानेवारी रोजी दुपारी संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात आजूबाजूच्या पाच ते सहा गावांतील नागरिकांनी सहभाग घेतला. गावकऱ्यांनी परिसरातील सर्व कंपन्यांच्या अनधिकृत वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवून निषेध नोंदवला.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रक वाहतूक होत असून यामुळे वातावरणात प्रचंड प्रदूषण वाढले आहे. धुळीमुळे रस्त्यावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. शाळकरी मुले आणि सामान्य लोकांना अपघाताचा धोका वाढला आहे.
ग्रामपंचायत सरपंच गुलाब ससाने यांनी कंपन्यांवर गंभीर आरोप करत सांगितले की, ‘अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या कारखान्यांनी ग्रामपंचायतीची परवानगीही घेतलेली नाही.’
शेतकरी किसन चौधरी यांनी यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यांनी माध्यमांसमोर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे दाखले दिले आणि बंधाऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती दाखवली.
या सर्व कारखान्यांनी आवश्यक त्या सर्व राज्य शासन व केन्द्र सरकारच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का? याबाबत संशय व्यक्त केला आहे.
संबंधित परवानग्यांमध्ये पर्यावरण विभाग, हरित लवाद, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत मंजुरी, भूविज्ञान विभाग, महसूल विभाग, वाहतूक परवाना, आणि कामगार सुरक्षा मानके यांचा समावेश आहे येथील सर्व कामे अनधिकृतच आहेत असे यावेळी सांगितले.
गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत संतप्तपणे विचारले की, ‘येथील अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून आहेत का?’ त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान दिले की, ‘या रस्त्यावर सायकल चालवून दाखवा!’
गावकऱ्यांच्या मते, या रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिकांचे प्राण गेले आहेत. सरकारने गेल्या पाच वर्षांचा अहवाल जाहीर करून मृत्युमुखींची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.
डोंगर सपाटीकरण, प्रदूषण, आणि सीएसआर निधीचा योग्य उपयोग होत नसल्याचेही आरोप करण्यात आले. गावकऱ्यांनी कंपन्यांना आपल्या सीएसआर निधीतून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
स्वातंत्र्य न्यूज, नाशिक – ‘न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी’.”