नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जे.एम. पाटील यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी निधी उपलब्ध नसतानाही बेकायदेशीर निविदा काढल्या आणि वर्क ऑर्डर दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून एक रुपयाही मंजूर नसतानाही निविदा प्रकाशित करून, काही ठराविक ठेकेदारांना हे काम देण्यात आले. इतकेच नव्हे, तर या निविदांची जाहिरातही प्रसारित करण्यात आली, ज्यामुळे सरकारवर आर्थिक दायित्व लादले गेले.
याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, जे.एम. पाटील हे साडेसहा वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत! इतक्या प्रदीर्घ काळ एका जागी राहण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
फक्त एवढेच नाही, तर या अधिकाऱ्याने एका खासगी अभिकरणाला मदत करण्यासाठी शासनाच्या संसाधनांचा गैरवापर केल्याचेही समोर आले आहे. लव्हाळवाडी प्रकल्पासाठी निडल गेट तयार करण्यासाठी शासनाच्या वर्कशॉपमधील वीज, उपकरणे आणि मनुष्यबळाचा वापर करून खासगी ठेकेदाराला मदत करण्यात आली.
याबाबतच्या चौकशीला मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयाने सुरुवात केली होती, मात्र सध्या कोणाच्या तरी आशीर्वादाने ही चौकशी दडपली गेल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी सरकारकडून ठोस कारवाई होईल का? उच्चस्तरीय चौकशी केली जाईल का? आणि साडेसहा वर्षे एका खुर्चीवर कार्यरत राहण्यामागचे रहस्य उलगडेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी 📕