मकर संक्रांतीच्या उत्सवाचा गोडवा वाढवण्याऐवजी नायलॉन मांजाने कुटुंबांचा जीव घेतला आहे. दरवर्षी अनेक निष्पाप जीवांचे बळी जात असताना, नायलॉन मांजा उत्पादन, वाहतूक आणि विक्री यावर कारवाईचा अभाव जनतेच्या जखमांवर मीठ चोळतो आहे.
नायलॉन मांजावर बंदी असतानाही तो उघडपणे विकला जातो. ही साखळी केवळ भ्रष्टाचारामुळे चालते, असे सामान्य जनतेचे मत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणावर कठोर पावले उचलली जात नाहीत. एवढेच नाही, तर काही ठिकाणी स्थानिक अधिकार्यांवरही डोळेझाक केल्याचे आरोप आहेत.
दरवर्षी होणाऱ्या अपघातांमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत, मात्र शासनाचा हलगर्जीपणा उघडपणे दिसून येतो. जर प्रशासनाने ठरवले, तर ८ दिवसांत दोषींना शिक्षा होऊ शकते. पण यंत्रणेला व्यापलेल्या भ्रष्टाचारामुळे यावर तोडगा लागत नाही, असा आरोप संतप्त नागरिक करत आहेत.
प्रश्न जनतेचा: नायलॉन मांजाविरोधातील संघर्ष किती काळ सुरू राहणार?
सामान्य नागरिकांनी या प्रश्नावर न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्याची मागणी केली आहे. “कसली संक्रांत, जी कुटुंबं उद्ध्वस्त करते?” हा प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करणारा ठरतो आहे. संस्कृती जपणे आवश्यक परंतु नायलॉन मांजा वापरणे प्राण घातकपणाच आहे.
आता सरकारने आणि प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून या मुद्द्याचा कायमस्वरूपी तोडगा काढला नाही, तर जनतेचा संताप उग्र रूप धारण करेल, हे निश्चित!
अशाच एका नायलॉन मांजाचा बळी जाऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
नाशिक: पाथर्डी फाटा येथे मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे सोनू किसन धोत्रे (वय २२, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प) यांचा गळा कापून दुर्दैवी मृत्यू झाला. मकर संक्रांतीच्या उत्सवात ही दु:खद घटना घडली. सोनू यांचे लग्न मे महिन्यात होणार होते. नायलॉन मांजावर बंदी असूनही तो खुलेआम विक्री होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी