भारतीय नकली नोट छपाईच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत देशभरात विविध शहरांमध्ये कारवाई करून सात गटांचा पर्दाफाश करण्यात आला. भारतीय चलनी नोटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिक्युरिटी पेपरच्या आयातीसह नकली नोट छपाई करणाऱ्या टोळ्यांविरोधात राजस्व गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू आणि बिहारमध्ये 11 ठिकाणी छापे टाकले.
फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई
याआधी 8 फेब्रुवारी रोजी डीआरआयने उत्तर प्रदेशातील गाजीपूर आणि कर्नाटकमधील बंगळुरू येथे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या आरोपींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि “भारत” लोगो असलेले सिक्युरिटी पेपर आयात केले होते. त्यानंतर, 9 फेब्रुवारीला डीआरआयने महाराष्ट्रातील ठाणे आणि हरियाणातील भिवानी येथे छापा टाकून आयात केलेल्या सिक्युरिटी कागदांचा वापर करून भारतीय नकली नोट छापणाऱ्या दोन ठिकाणांचा पर्दाफाश केला. त्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली.
मुंबईतून मोठा साठा जप्त
राजस्व गुप्तचर संचालनालयाने मुंबईतील विक्रोळी पश्चिम भागात छापा टाकून मोठ्या प्रमाणावर नकली नोट छपाईच्या ठिकाणाचा पर्दाफाश केला. 50 आणि 100 रुपयांच्या नकली नोटांसह विविध प्रिंटिंग उपकरणे जप्त करण्यात आली. जप्त झालेल्या वस्तूंमध्ये लॅपटॉप, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, सिक्युरिटी पेपर, महात्मा गांधी वॉटरमार्क असलेले A4 साईज कागद आणि बटर पेपर यांचा समावेश आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही कारवाई
- महाराष्ट्रातील संगमनेर आणि कोल्हापूर येथेही अशाच प्रकारच्या नकली नोट छपाईच्या सेटअपचा पर्दाफाश करण्यात आला. दोन्ही ठिकाणी प्रिंटर आणि संगणक यंत्रणा वापरून बनावट नोटा छापल्या जात होत्या. पोलिसांनी दोघांना अटक करून सर्व साहित्य जप्त केले.
- कोल्हापूरच्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कर्नाटकमधील बेळगाव येथे आणखी एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि तिथून तीन आरोपींना अटक केली.
- आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी, बिहारमधील खगडिया आणि हरियाणातील रोहतक येथेही सुरक्षा कागद आयात करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात आला.
- पश्चिम गोदावरीमध्ये प्रतिबंधित सिक्युरिटी पेपर आणि प्रिंटर, तर खगडियामध्ये लॅपटॉप, प्रिंटर आणि सिक्युरिटी कागद जप्त करण्यात आले.
सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (IPC) अंतर्गत गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
#swatantryanews#marathinews#maharashtra#