swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > कला, क्रीडा आणि संस्कृती > छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

पॅरिस, दि. २३: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसमध्ये दाखल झाले आहे.

आज या शिष्टमंडळाने वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. तसेच युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री. शर्मा हे महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असल्याने त्यांचेही या प्रक्रियेस पाठबळ लाभणार असल्याची भावना मंत्री शेलार यांनी व्यक्त केली.

जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील टप्पे

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाले असून, किल्ल्यांचे नामांकन युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहे. मात्र अंतिम निर्णय होण्यासाठी अजून काही टप्पे बाकी आहेत.

या प्रक्रियेसाठी पुढील तयारी, सादरीकरण आणि आवश्यक बाबींची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला गेले आहे. यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन हेही शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

ऐतिहासिक वारसासाठी महत्त्वाचे पाऊल

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले किल्ले महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास त्यांचे जागतिक स्तरावर संवर्धन, पर्यटनवाढ आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होण्यास मोठी मदत मिळेल.

महाराष्ट्र शासनाच्या या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक स्तरावर सन्मान वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

#swatantryanews#marathinews#maharashtra#

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *