भारतीय सैन्याच्या लढाऊ क्षमतेत क्रांतिकारक वाढ करण्यासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे. नाशिक रोड येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CATS) येथे आज झालेल्या दीक्षांत समारंभात आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोदकुमार नांबियार यांनी हे स्पष्ट केले.
समारंभात कॉम्बॅट एव्हिटर्स कोर्स 42, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स 41, आणि आरपीएएस इंटर्नल पायलट कोर्स 4 पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी, वैमानिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन करत लेफ्ट. जनरल नांबियार यांनी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सुरू असलेल्या लष्करी सुधारणांचा उल्लेख केला.
त्यांनी सांगितले की, लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे AH-64 आणि प्रीडेटर (MQ-9B) यांचा समावेश भारतीय सैन्याची ताकद अधिक वाढवेल. फ्लाइंग सिम्युलेटर, मानवरहित विमान प्रणाली, आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे.
प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव
समारंभात, चार महिला अधिकाऱ्यांसह नेपाळ व नायजेरियाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट पदवी मिळवली. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कॅप्टन सक्षम गोस्वामी, कॅप्टन हेन्री रजनी, मेजर अरविंदर पुरी आणि मेजर तुफैल अहमद यांना विविध ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.